जरूर वाचा.

जरूर वाचा.

सध्या जिवंत असलेल्यांपैकी बहुतांश लोकांनी ना नेहरूंना बघितलंय ना गांधींना ना पटेलांना ना एसेम वा डांगेंना ना गोळवलकरांना. लोकांच्या मनावर गारूड करण्याचं व्यक्तिमत्त्व असलेल्या आधीच्या पिढ्यांपैकी अटलबिहारी वा इंदिरा गांधींनाही आपण फारसं बघितलेलं वा ऐकलेलं नाही. प्रसारमाध्यमांचा अभाव, सोशल मीडियाचा अभाव, रेकॉर्डिंग्सचा अभाव अशी अनेक कारणं त्यामागे असू शकतील. या सगळ्या पार्श्वभूमीवर गेल्या 10 ते 12 वर्षांमध्ये आपण बऱ्याच नेत्यांना, वक्त्यांना पाहू शकलो, ऐकू शकलो, त्यांच्याबद्दल आलेलं लिखाण सविस्तरपणे वाचू शकलो. सीताराम येचुरी, कपिल सिब्बल, सलमान खुर्शीद, प्रणब मुखर्जी, मनमोहन सिंग, अब्दुल कलाम, लालकृष्ण आडवाणी, प्रमोद महाजन, शरद पवार, राज ठाकरे विशेषत्वाने बाळासाहेब ठाकरे आणि सध्या ज्यांच्या झंझावाताने सगळ्यांनाच झोपवलंय ते नरेंद्र मोदी अशा अनेक ज्येष्ठ वक्त्यांची भाषणे आपण ऐकू शकलो, त्यांच्याबद्दल इतरांनी व्यक्त केलेली मते आपण ऐकू शकलो. या यादीमध्ये सोनिया गांधी व राहूल गांधींचं नाव लिहायचा विचार होता, पण धीर नाही झाला…
हे सगळे वक्ते, विचारवंत आहेत, देशभक्त आहेत, अत्यंत प्रामाणिक आहेत आणि सगळे चांगले मार्गदर्शक आहेत यात वाद नाही, परंतु आत्तापर्यंत विद्वज्जन म्हणून गौरवलं जाण्यासाठी अनिवार्य मानली जाणारी इंग्रजी, धड न येणाऱ्या चहावाल्याच्या पोरानं काय असं जनमानसावर गारूड केलं याचा आणि Either you Love or Hate Him, But can not Ignore Him अशा स्थितीचा तटस्थ विचार करणं आवश्यक ठरतं.
त्यामुळे, या सगळ्यांमधल्या नरेंद्र मोदींबद्दल बोलताना मला वाटतं, त्यांचा आपल्याला नक्की माहित असलेला प्रवास, त्यांची परिस्थिती, त्यांच्या मुलाखती, त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांच्याबद्दल अनेकांनी वेळोवेळी केलेलं विश्लेषण, त्यांच्याबद्दल मुख्यत: विरोधात झालेला तुफानी प्रचार या सगळ्याकडे वस्तूनिष्ठ नजरेने बघितलं, पक्षांतर्गत तसेच बाहेर उमटलेले पडसाद नीट निरखले तर नरेंद्र मोदी हे रसायन काय आहे ते हळू हळू लक्षात येतं. नरेंद्र मोदींमुळे राजकारणाकडे बघायच्या सगळ्यांच्या दृष्टीत, आकलनात, प्रतिसादात आमूलाग्र बदल झालाय…. वानगीदाखल एक उदाहरण बघा… नोटाबंदीचा निर्णय मोदी आणि मोजके लोक सोडले तर कॅबिनेटला पण माहीत नव्हता. निर्णय घेतल्यानंतर जाहीर करेपर्यंत सगळ्या मंत्र्यांना मोबाईल फोन उपलब्ध नव्हता… जरा, विचार करा अशा प्रकारची घटना अडीच वर्षांपूर्वी घडली असती, तर मुख्य चर्चा… पक्षामध्ये बेबनाव, अंतर्गत कलह चव्हाट्यावर, बड्या मंत्र्यांना किंमत नाही, अर्थमंत्री नाराज – राजीनामा देण्याची शक्यता, पक्षामध्ये फूट पडण्याची शक्यता अशा अंगानं घडल्या असत्या की विचारता सोय नाही. उलट आज आठ दिवस होऊन गेले, लोकांचे हाल संपत नाहीयेत आणि किमान महिनाभर परिस्थिती पूर्णपणे रूळावर येणार नाही हे दिसतंय. तरीही मोदींच्या मागे नुसता भाजपाच नाही तर मोठ्या प्रमाणावर जनाधारही आहे असं वाटतंय. निर्णय योग्य आहे, परंतु पूर्वतयारी कमी पडली असाच सगळ्यांचा कौल असून मोदींना साथ द्यायला हवी असा एकंदर कौल दिसतोय. जर चलन पुरवठा दीर्घकाळ लांबला तर मात्र मोदींच्या लोकप्रियतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो हे ही उघड आहे.
असो… तर मुख्य मुद्दा असा आहे की, मोदी हे रसायन काय आहे हे शोधणं आणि गेल्या 14 ते 15 वर्षांमध्ये म्हणजे 2002 च्या गुजरात दंगली ते नोटाबंदी या काळात मोदी, मोदीभक्त आणि मोदीरूग्ण यांची गृहीतकं कशी राहिली आहेत… मोदींचे कट्टर विरोधक कसे तयार झाले, त्यांनी भक्तांची निर्मिती कशी केली आणि नव-नमोरूग्णांनी व नव-नमोभक्तांनी मोदींचंच भलं कसं केलं, हे बघणं रंजक आहे. रूग्ण व भक्त दोघेही आताच्या घडीपर्यंत आपल्याच ट्रॅपमध्ये अडकले आहेत. मोदींना ना नमोरूग्णांमध्ये रस आहे ना त्यांना नमोभक्तांप्रती फारशी आस्था आहे, त्यांचा प्रवास नीट बघितला तर हे लक्षात येईल. त्यासाठी 2002 ते 2016 या कालखंडातल्या घडामोडी बघाव्या लागतील.
प्रतिमा मलीन असलेला काळ
2002च्या दंगलीनंतर अत्यंत नवीन मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदींनी टिव्हीवर शांततेची आवाहनं केली, क्रियेला प्रतिक्रिया उमटत आहे असं म्हटलं, मध्यप्रदेश व महाराष्ट्र सरकारकडे पोलीसांची कुमक पाठवण्याची विनंती केली ( हे मध्यप्रदेशचे तत्कालिन मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्या समक्ष एका कार्यक्रमात मोदींनी सांगितलं आणि त्याचा प्रतिवाद सिंह यांनी केलेला नाही) जी दोन्ही काँग्रेस प्रशासित राज्यांनी मान्य केली नाही. शेवटी लष्कर पाचारण करण्यात आलं, परंतु तोपर्यंत 900 च्या आसपास बळी गेले होते. (यातही गंभीर बाब म्हणजे काँग्रेसशासित केंद्र सरकारने एकूण बळींची संख्या 900 च्या आसपास होती आणि त्यात 250 च्या आसपास हिंदू होते हे संसदेत सांगितलंय. बहुतांश हिंदू पोलीस गोळीबारात मारले गेले हे ही उघड आहे. परंतु सगळीकडे 2000च्या वर मुस्लीम मारले गेले असं सरसकट सांगितलं जातं, हिंदूंबद्दल बोललं जात नाही. मोदींनीही स्वत:हून याबाबत कधीही जाहीर वक्तव्य केलं नाही, किंबहुना त्यांनी अशा वर्गवारीकडे दुर्लक्षच केलं आणि आपण राजधर्माला जागलो होतो एवढंच सांगितलं, ज्यावर कुणी विश्वास ठेवला नाही.) पण त्यावेळी  परिणाम झाला तो असा की, गुजरातच्या दंगलींनी नरेंद्र मोदींना देशभरात व विदेशात बदनाम केलं. खरं खोटं माहीत नाही, परंतु वाजपेयी मोदींना हटवणार होते, आडवाणींच्या आग्रहामुळे मोदींची खुर्ची अबाधित राहिली. विदेशामध्येही मोदींना चार हात लांब ठेवण्याकडेच सगळ्यांचा कल राहिला. अमेरिकेसह बहुतांश प्रगत जगात मोदीविरोधी सूर होता, जो पुढच्या काळात लंबकाच्या दुसऱ्या टोकाला गेला, आणि इंग्लंडने सुरूवात केल्यानंतर सगळ्यांनी मोदींसाठी पायघड्या पसरल्या.
त्या काळामध्ये म्हणजे 2002 ते 2005 – 6 या कालावधीमध्ये मोदींची जाहीर भूमिका नेहमीच संपूर्ण गुजराती समाजाचं कल्याण अशीच जाहीररीत्या राहिलेली आहे. त्यांची उपलब्ध असलेली कुठलीही भाषणाची क्लिप यू ट्यूबवर बघितली तर मोदींनी हिंदू या शब्दाचा देखील वापर केलेला दिसत नाही. एकीकडे अत्यंत स्पष्ट शब्दांत माझे 5 कोटी गुजराती बांधव अशी सर्वसमावेशक भूमिका घ्यायची आणि दुसरीकडे विरोधकांनी तयार केलेल्या मुस्लीमद्वेष्टा आणि हिंदूंचे मसीहा या मुखवट्याचाही फायदा घ्यायचा अशी कसरत करत काँग्रेसला नेस्तनाबूत करायची कामगिरी त्यांनी तब्बल दशकाहून जास्त काळ केली.
विरोधकांना आजही त्यांनी काय घोडचूक केली हे लक्षात आलेलं दिसत नाहीये, त्यावेळी तर मौत का सौदागर इथपर्यंत उपमा देत काँग्रेसने आपल्याच पायावर धोंडा मारून घेतला होता. असं जातीयवादी वातावरण माध्यमांमध्ये असताना, जमिनीवर मात्र, विजेपासून ते पायाभूत सुविधा, शिक्षणापासून ते नर्मदेच्या पाण्यापर्यंत आणि सुलभ जमीन हस्तांतरण ते एफडीआय (Vibrant Gujarat) असे कार्यक्रम मोदींनी सरकारी यंत्रणेला विश्वासात घेऊन किंवा कामाला लावून केले. ज्यामुळे गुजरातच्या कानाकोपऱ्यामध्ये भाजपाची व्होटबँक तयार झाली, जी जाती-धर्म आधारीत नव्हती. उलट मोदी हिंदुत्ववादी संघटनांना किंमत देत नाहीत, त्यांच्या नेत्यांना भेटायला वेळही देत नाहीत, अशीच त्यावेळी ओरड होती. विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मोदी हिंग लावून विचारत नाहीत अशा बातम्याही त्यावेळी वरचेवर यायच्य़ा, त्याची अजूनही ठसठसती नस म्हणजे संजय जोशी…
मुस्लीम द्वेष्टे असा शिक्का बसलेल्या मोदींनी झफर सरेशवालांच्या मते प्रत्यक्षात गुजरातमध्ये मुस्लीमांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले. त्याचवेळी रस्ता रुंदीकरणासाठी मोदींनी शेकडो अनधिकृत देवळं पाडली अशाही बातम्या येत होत्या. थोडक्यात म्हणजे प्रतिमा मलीन असलेल्या या कालखंडात मोदींनी केवळ गुजरातच्या विकासावर लक्ष केंद्रीत करून सरकारी यंत्रणेला कामाला लावल्याचं आणि गुजरात हा भाजपाचा पर्यायानं स्वत:चा बालेकिल्ला बनवल्याचं दिसतं… मला एक प्रसंग आठवतोय, 2004-5 च्या सुमारास, नर्मदा प्रकल्पातील कालव्यात प्रथम पाणी सोडण्याचा शुभारंभ होता. किर्लोस्कर कंपनीची संपूर्ण यंत्रणा होती, त्यांनी उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मुंबईतल्या पत्रकारांनाही बोलावलं होतं. त्यावेळी मोदींबरोबरच, लालकृष्ण आडवाणी, सुमित्रा महाजन आदी नेते होते. अहमदाबादपासून शंबरेक किलोमीटर लांब कुठेतरी अक्षरश: जंगलात हा प्रकल्प होता. पण भव्य शामियाना उभारला होता, हजारोंच्या संख्येने आजुबाजुच्या गावागावांमधले लोक आले होते. कार्यक्रम वेळेत सुरू झाला आणि त्यावेळी पहिल्यांदा लोकांच्या मनात मोदी काय चीज आहे, हे दिसलं. मोदींच्या आधी एकाही वक्त्याला दोन मिनिटं देखील बोलू देत जात नव्हतं. आडवाणींपासून ते स्थानिक नेत्यांपर्यंत जो कोणी उभा रहायचा, त्यावेळी मोदी मोदींचा जयजयकार सुरू असायचा, वक्ता निरोप घेईपर्यंत. शेवटी मोदी जेव्हा बोलायला उभे राहिले त्यावेळी, त्यांनी बोलायला सुरूवात करताच अक्षरश: क्षणात संपूर्ण शांतता परसली. त्यांचं गुजरातच्या विकासाला नर्मदा कसा हातभार लावणार या अंगानं गुजरातीतून भाषण झालं, आणि कार्यक्रम संपला. पत्रकारांशी फार चर्चा न करता, जुजबी बोलून, परंतु सगळ्या पत्रकारांची व्यवस्थित सोय झालीय ना, काही त्रास नाही ना अशी चौकशी करून मोदी निघून पण गेले. त्याचवेळी जाणवलेली गोष्ट म्हणजे, मोदी फक्त आणि फक्त लोकांना किंमत देतात आणि लोकही मोदींना प्रचंड मान देतात. याचीच प्रचिती पुढच्या काळात देशपातळीवर यायला लागली.
प्रतिमा उदयाचा काळ
महाराष्ट्र सरकारच्या उद्योग खात्याच्या मुंबईतल्या कुठल्याही कार्यक्रमात हटकून गुजरातच्या औद्योगिक विभागाचे अधिकारी असायचे आणि ते सगळ्या डेलिगेट्सना आपलं कार्ड देऊन तुम्ही महाराष्ट्रात रहा, आमचं काही म्हणणं नाही, पण फक्त एकदा गुजरातला भेट द्या असं सांगायचे… काही वर्षांनी महाराष्ट्रातले अमुक अमुक प्रकल्प गुजरातला गेले अशा बऱ्याच बातम्या यायच्या ( हा स्वानुभव आहे). त्य़ाची बीजं गुजरातच्य़ा अधिकाऱ्य़ांनी घेतलेल्य़ा परीश्रमात आहे. मोदींनी जाणीवपूर्वक बंजर जमिनी असलेल्या भागांमध्ये औद्योगिकरण केले. आधी वीज आणली, रस्ते बांधले, नर्मदेचं पाणी पोचवलं आणि महाराष्ट्राच्या तुलनेत अत्यंत कमी किमती असलेल्या जमिनींवर औद्योगिक नगरी उभारल्या. गुजरातच्या प्रगतीमध्ये जितका वाटा मोदींच्या सरकारनं उभारलेल्या पायाभूत सुविधांचा आहे, तितकाच वाटा गुजरातमधल्या स्वस्त जमिनींचा आहे. ज्या जमिनींना किंमतच नव्हती, अशा जमिनी करोडो रुपयांच्या किमतीच्या झाल्या. कच्छ- सौराष्ट्रशी नाळ अजून असलेल्या कुठल्याही गुजराती व्यक्तीला विचारा, तो सविस्तर सांगेल.
आधी पाणी, रस्ते, वीज, पायाभूत सुविधा असे उपक्रम केल्यानंतर उद्योगांसाठी मोदींनी पायघड्या पसरल्या. केवळ मुंबई बंदरामुळे महाराष्ट्राचा विकास झालाय हे हेरून, गुजरातमध्ये बंदरांच्या विकासाची प्रचंड मोहीम उघडण्यात आली किंवा आधीच्या धोरणांना चालना देण्यात आली. त्याआधीच्या काळात मुख्यत: महाराष्ट्रात औद्योगिक विकास होता, आणि नवी गुंतवणूक येत होती. मात्र, महाग जमिनी, सरकारी लाल फितीचा कारभार, भ्रष्टाचार आणि विजेची टंचाई (त्यावेळी आपल्याकडे बहुतांश भागात लोडशेडिंग होतं) या महाराष्ट्रातल्या उणीवांचा अचूक फायदा मोदींच्या गुजरातनं उचलला. गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पेटल गेल्या वर्षी मुंबईत आल्या आणि त्यांनी गुजरातमध्ये येण्याचं आवाहन केलं. यावरून शिवसेनेसह अनेकांनी जोरदार टीका केली आणि भाजपावर व त्यातही मोदी व पटेलांवर निशाणा साधला. दुर्देव हे आहे की, हे गेली दहा वर्षे होत होतं, आपल्या नेत्यांना कळतंच नव्हतं कारण ते त्यांच्यात मस्तीत धुंद होते. आधी महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईतल्या ताज किंवा ट्रायडंटमध्ये उद्योजकांना व परिषदांना मुख्यमंत्री मोदी यायचे, महाराष्ट्राच्या नाकावर टिच्चून हजारो कोटींची गुंतवणूक गुजरातला न्यायचे, तोच कित्ता आनंदीबेननी सुरू ठेवला इतकंच…
त्यातूनच, अंबानी, अदानी पुढे जात टाटा, मारुति अशा उद्योगांची कास धरत, गुजरातमध्ये पाच वर्षे केवळ विकासाची कामं करायची (किंवा करतो असं दाखवायचं,जसं ज्याचं मत, तसं) आणि निवडणुकीच्या काळात विरोधकांवर तुटून पडायचं आणि पाच कोटी गुजराती जनतेला आवाहन करत विरोधकांना (अंतर्गत तसंच बाह्य) चीतपट करायचं हा उपक्रम तीन निवडणुका सुरू राहिला. जाणीवपूर्वक मोदींनी स्वत:च्या प्रतिमेवर लक्ष केंद्रीत केलं आणि विकासपूरूष अशी प्रतिमा निर्माण केली. मोदी म्हणजे विकास, मोदी म्हणजे बिझिनेस, मोदी म्हणजे सुबत्ता हे समीकरण मोदींनी या कालावधीत लोकांच्या मनावर बिंबवलं आणि एक दुसरी प्रतिमा तयार केली विकासपुरूषाची… मुस्लीमद्वेष्टा म्हणजेच हिंदूंचा त्राता अशी एक इमेज बालिश विरोधकांनी केली होतीच, तिचा धार्मिक पगडा असलेल्या जनमानसावर परिणाम आणि विकासाची कास बाळगलेल्याच्या मनावर विकासपुरूषाच्या प्रतिमेचा परिणाम. पुढे येणाऱ्या मोदीयुगाचा पाया जर काही असेल तर तो हा कालखंड होता. मलिन प्रतिमा ते प्रतिमा उदयाचा हा काळ हा मोदीयुगाची नांदी होता.
मोदीयुगाचा उदय
2009 नंतर गोध्राचं भूत बऱ्यापैकी मानगुटीवरून उतरलेलं होतं, कोर्टामध्ये त्यांच्याविरोधातले आरोप सिद्ध झाले नव्हते आणि पुढे सुप्रीम कोर्टानंही मोदींना दोषमुक्त केलं. परंतु, विरोधकांच्या विशेषत: काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांनी एका राज्याच्या मुख्यमंत्र्याविरोधात इतकी गरळ ओकली, ते मुस्लीम द्वेष्टे आहेत हे इतकं भिनवलं की, कळत नकळत देशभरातले मुस्लीम आणि कथित सेक्युलर विचारवंत मोदीविरोधी होत गेले आणि बहुसंख्य हिंदू मोदीभक्त तरी झाले किंवा मोदींबद्दल सहानुभूती बाळगू लागले. यातला आणखी एक विरोधाभास म्हणजे खुद्द गुजरातमधल्या मुस्लीमांनी मोदींना तितकं झिडकारलं नव्हतं, जे पंचायती ते विधानसभेपर्यंतच्या निवडणुकांवरून स्पष्ट होतं, परंतु गुजरात दंगलीची काहीच माहिती नसलेल्या इतर राज्यातल्या मुस्लीमांनी आणि कथित सेक्युलर विचारवंतांनी त्यांना झिडकारलं होतं. तर, ज्यांना काँग्रेसचा दावा पटत होता, अशांपैकी काही हिंदूंनी मुस्लीमांना धडा शिकवायला हवाच होता असं मानलं आणि तसं उघड मत व्यक्त करत कळत नकळत मोदींच्या पारड्यात कौल दिला. तर, ज्यांचं शिर धडावर आहे आणि जे मुस्लीमद्वेष्टे नाहीत अशा बहुसंख्य हिंदूंनाही गुजरातचा विकास दिसत होता. मोदी भ्रष्ट नाहीत, ते विकासाची भाषा बोलतात आणि मोठी स्वप्न बघतात या गोष्टी कथित हिंदुत्ववादी नसलेल्यांनाही भावल्या आणि मोदींचा मासबेस गुजरातबाहेरही तयार व्हायला सुरूवात झाली. या सगळ्यात, मोदींनी त्यांच्या जमेच्या तसेच विरोधात असलेल्या दोन्ही बाजुंचा अत्यंत खुबीनं वापर करून घेतला. राममंदीर आंदोलन आणि रथयात्रेमुळे नव्वदच्या दशकात भाजपा सत्तेसमीप आला. या संपूर्ण रथयात्रेचं श्रेय होतं अडवाणींचं. थोडक्यात, आडवाणींनी हिंदू समाजाचं ध्रुवीकरण केलं म्हणून भाजपा सत्तेजवळ आला, परंतु पंतप्रधान झाले वाजपेयी, कारण सत्तास्थापनेसाठी टेकू लागणार होता. जे टेकू देऊ शकत होते त्या कथित सेक्युलरांना हिंदुत्ववादी आडवाणींचा चेहरा नको होता. (गंमत म्हणजे 2014 मध्ये याच कथित सेक्युलरांनी मोदी नकोत, सेक्युलर आडवाणी हवेत असा आव आणला). आडवाणींनी केलेल्या हिंदूच्या ध्रुवीकरणामुळे मिळालेल्या सत्तेत, सेक्युलर चेहरा असलेले वाजपेयी पंतप्रधान झाले.
मोदी इथे वेगळे ठरतात… त्यांनी स्वत:हून कधीही हिंदूचा मसीहा अशी इमेज केली नाही, परंतु ते मुस्लीम विरोधी आहेत ही विरोधकांनी केलेली इमेज अत्यंत खुबीने वापरत, ते हिंदूंचे तारणहार ठरलेच, शिवाय जाहीर भूमिका ही कायम विकास, विकास आणि विकास अशीच घेत त्यांच्या उक्तीत व कृतीत जातीयवाद आहे असं म्हणायचीही सोय नाही ठेवली.
ज्यावेळी काँग्रेसच्या काळातले सगळे घोटाळे बाहेर यायला लागले, त्यावेळी मोदींचा प्रतिमा उदय होत आलेला होता. गुजरातचा विकासपुरूष ते झाले होते. केंद्रात काँग्रेसविरोधी वारे होते. त्यावेळी अत्यंत दूरदृष्टी आणि वाऱ्याचा अंदाज असलेल्या मोदींनी स्वत:ला गुजरातपुरता सीमित न ठेवता आवाका वाढवण्यास सुरूवात केली. लोकसभेच्या निवडणुका 2014 मध्ये होणार होत्या. गुजरातच्या निवडणुका 2012 मध्ये झाल्या, परंतु वर म्हटल्याप्रमाणे विरोधकांनी केलेल्या विखारी प्रचाराचा अत्यंत चातुर्याने फायदा घेत मोदींनी एका राज्याची निवडणूक देशाच्या निवडणुकीइतकी महत्त्वाची केली. त्याला खतपाणी घातलं देशभरातल्या मीडियानं. यापूर्वी कुठल्याही राज्याच्या निवडणुकीला राष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी कधीही दिलं नाही इतकं महत्त्व गुजरातच्या निवडणुकांना दिलं आणि मोदींचं काम आणखी सोपं झालं.
ज्यावेळी मोदींनी गुजरात जिंकला, त्याचवेळी त्यांचं लक्ष दिल्लीकडे होतं. काँग्रेस जाणार हे दिसत होतं, भाजपा वगळता दुसरा सक्षम विरोधी पक्ष नाही हे ही दिसत होतं, त्य़ामुळे भाजपाला संधी आहे हे ही कळत होतं आणि भाजपामध्ये आडवाणी, सुषमा स्वराज, राजनाथ सिंह, शिवराज सिंह, नितिन गडकरी असे मोजके नेते वगळता पंतप्रधानपदाच्या स्टॅच्युअरचा दुसरा उमेदवार नाही हे ही उघड होतं. मोदींनी अत्यंत खुबीने आधी स्वत:ला यांच्याबरोबरीचे तुल्यबळ उमेदवार असं प्रोजेक्ट केलं. प्रचारतंत्रात अत्यंत वाकबगार असलेल्या मोदींनी या बाबतीत भाजपाच्या अन्य धुरीणांना पार माती दाखवली. काँग्रेसची वाताहत झाली, त्यावेळी राष्ट्रीय स्तरावर काँग्रेसची धुळधाण उडवण्यात अरूण जेटली, सुषमा स्वराज, राजनाथ सिंह, आडवाणी आघाडीवर होते. संसदेचं कामकाज रोखणं असो वा प्रसारमाध्यमांना सामोरे जाणं असो, हेच नेते समोर होते, त्यावेळी मोदी गुजरातेत होते. परंतु या सगळ्या नेत्यांचा युपीए-2 च्या काळात निर्माण झालेला प्रभाव मोदींनी  2012 नंतरच्या अवघ्या दीडेक वर्षात आपला करीश्मा वाढवत इतका कमी केला, की मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करणं ही केवळ औपचारिकता राहिली.
आत्तापर्यंतची अशी पद्धत होती, की प्रत्येक राज्याचा मुख्यमंत्री वा निवडलेला नेता, विजयी सभेमध्ये त्या राज्याच्या राजधानीमध्ये किंवा मतदारसंघामध्ये स्थानिक भाषेत बोलतो. याला गुजरात अपवाद ठरला. निवडणूक जिंकल्यानंतर बडोद्यामध्ये विजयी सभेमध्ये अत्यंत दूरदर्शीपणे नरेंद्र मोदींनी हिंदीमधून भाषण केलं. ते नुसत्या देशातल्या जनतेला हे सांगत नव्हते की मी पुन्हा गुजरात जिंकलाय, तर ते देशभरातल्या भाजपा कार्यकर्त्यांना आवाहन करत होते, की मी तो चेहरा आहे, मी ते करीश्मा असलेलं व्यक्तिमत्त्व आहे, जे तुम्हाला केंद्रात सत्ता मिळवून देऊ शकेल. देशातला भाजपा हा एकमेव मोठा पक्ष असा आहे, जिथे पक्षांतर्गत लोकशाही आहे, घराणेशाही नाही. त्यामुळे बहुसंख्य कार्यकर्त्यांचा पाठिंबा असलेला नेता उमेदवार होऊ शकतो. या कार्यकर्त्यांच्या मनावर मोदींनी गारूड केलं आणि तसे स्पष्ट संकेत गुजरातची निवडणूक जिंकल्यानंतरच्या भाषणात दिले.
त्यामुळे, 2012 मध्ये गुजरातचं मुख्यमंत्रीपद स्वीकारतानाच मोदींनी पुढच्या लक्ष्याचे स्पष्ट संकेत दिले होते. एकतर ते भाजपातल्या धुरीणांना कळले नाहीत, किंवा कळूनही काही उपयोग नव्हता.
आपण शर्यतीतून नक्की कधी फेकले गेलो हे कधी कुणाला कळलंच नाही, आणि मोदींनी लॉबीइंग, ब्लॅकमेलिंग, पाठित खंजीर खुपसणं यातलं काहीही न करता केवळ कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळवून हे साध्य केलं. त्यामुळे उघड काही बोलायचीही सोय राहिली नाही. जवळपास एका दशकाहून जास्त काळ राष्ट्रीय स्तरावर पहिल्या फळीत राहिलेले नेते काही समजायच्या आत दुसऱ्या फळीत गेले. पंतप्रधानपदाचं स्वप्न बघितलेल्यांना केंद्रात मंत्रीपद मिळतं की नाही, मिळालं तर काय मिळतंय यासाठी मोदींकडे बघण्याची वेळ आली.
काँग्रेसच्या काळात झालेला भ्रष्टाचार, गुजरातच्या विकासाचा असलेला अनुभव, दंगलीप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केलेली मुक्तता, अमोघ वक्तृत्व, सामान्यांच्या भाषेत त्यांच्या प्रश्नावर बोलण्याचं कसब, चहावाला म्हणून हिणवलं त्याचाही फायदा करून घेण्याची वैश्यवृत्ती आणि अफाट मेहनत यांच्या बळावर मोदींनी एकहाती सत्ता भाजपाला दिली. हा विजय इतका मोठा आणि अनपेक्षित होता, की लालकृष्ण आडवाणींना नरेंद्रभाईकी भाजपापर बडी कृपा है, असं बोलावं लागलं. एकप्रकारे, आडवाणी उमेदवार असते तर भाजपाला इतक्या जागा मिळाल्या नसत्या हे खुद्द त्यांनीच मान्य केल्यासारखं आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका साध्या कार्यकर्त्याचा पंतप्रधानपदापर्यंत पोचेपर्यंतचा हा प्रवास झंझावाती होता. परंतु हा शेवट नव्हता, ही तर कुठे मोदीयुगाची सुरूवात होती. राहूल गांधींनी निवडणुकांच्या काळात मोदी हा गुब्बारा म्हणजे फुगा आहे, निकालानंतर फुटेल, असं म्हटलं होतं. कथित जाणता राजा शरद पवारांनीही आपल्या प्रदीर्घ अनुभवाचा दाखला देत, अशी लाट वगैरे काही नसतं, निकालानंतर कळेलच असं म्हटलं होतं. जनतेची नाडी अचूक जाणणारे मोदी त्यावेळी मनात निश्चित हसले असतील.
मीडियाला वापरणं म्हणजे काय?
कुठल्याही नेत्यासाठी प्रसारमाध्यमांमधलं स्थान महत्त्वाचं असतं. जर, कुठल्याही कारणामुळे प्रसारमाध्यमं नेत्यावर खूश असतील तर त्या नेत्याचं काम थोडं सोपं होतं. पण मोदींच्या वाट्याला हे सुख नव्हतं. 2002 पासून ते 2014 पर्यंत बहुतांश मीडिया हा मोदींबद्दल बोलताना 2002च्या दंगलींच्या चश्म्यातूनच बघायचा. जी चूक काँग्रेसने केली तीच चूक डाव्यांचा वरचश्मा असलेल्या मीडियातल्या मोठ्या गटानं केली. जर, मोठ्या प्रमाणावर बदनामी झाली तर कारकिर्द संपुष्टात येते हा अनुभवसिद्ध नियम. परंतु, काही नियमाला अपवाद असतात, आणि दृढ विचारांची माणसं असा अपवाद बनू शकतात. मीडिया आपल्याला अनुकूल नाहीये हे लक्षात आलेल्या मोदींनी अत्यंत धोरणी पाऊल उचललं, ते म्हणजे त्यांनी मीडियाशी संबंधच तोडला. मी स्वत: मोदींच्या दोन – तीन कार्यक्रमाला उपस्थित होतो, परंतु मोदींनी कधीही कार्यक्रमाचा जो अजेंडा आहे, त्याखेरीज एकाही प्रश्नावर कधीही चर्चा केली नाही. त्यांनी पत्रकारांना व टीकाकारांना दुर्लक्षानं मारलं. मेधा पाटकर, आमिर खान आणि अनेक बडे सेलिब्रिटी नी स्टार पत्रकार नर्मदा प्रकल्पावरून मोदींच्या हात धुवून मागे लागले होते, जोडीला अशरत जहाँ एनकाउंटर, गुजरात दंगल आदी फोडणी होतीच. मोदी या प्रश्नावर कधीही मीडियाला सामोरे गेले नाहीत, पोलीस आणि कोर्ट त्यांचं काम करतील, मी माझं करतो ही त्यांची एकमेव भूमिका राहिली. ज्यावेळी मीडिया तुमच्या विरोधात असतो, त्यावेळी तुम्ही लाख तुमची बाजू मांडलीत तरी तो तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यातच ठेवणार हे मोदींना माहित होतं. परिणामी त्यांनी आपल्या कामावर लक्ष केंद्रीत केलं आणि अत्यंत शहाणपणे मीडियाला फक्त वापरलं.
ज्या मीडियानं मोदींना अक्षरश: झोड झोड झोडलं होतं, त्याच मीडियाला काही वर्षांनंतर काँग्रेसचं सरकार असलेल्या केंद्राच्या खात्यांनी कुठल्या कुठल्या क्षेत्रात गुजरात आघाडीवर आहे हे छापायला लागलं होतं. गुजरात मध्ये विक्रमी गुंतवणूक होत होती. प्रत्येक बडी कंपनी गुजरातमध्ये जात होती. अनेक देशांचे करार गुजरातशी होत होते. एकेकाळी पोटापाण्यासाठी लोक देशभर विखुरताना बघणाऱ्या गुजरातमध्ये देशभरातून लोक नोकरीसाठी येत होते. मीडियामधल्या काहजणांना याची जाणीव व्हायला लागली आणि मोदींच्या विकासाचा मंत्र मीडियानं उचलला. जसं, एखाद्याला कितीही चिडवलं आणि तो चिडत नसेल तर चिडवणाऱ्याची मजा निघून जातेस तसंच मोदींनी गुजरात दंगली व बनावट चकमक आदीप्रकरणी मीडियाकडे दुर्लक्ष केलं आणि मीडियाही नंतर ताळ्यावर आलास मोदींच्या विकासाच्या तालावर नाचायला लागला. मीडिया त्याला किंमत देते, जो मीडियाला किंमत देत नाही, हे मोदींनी सार्थ ठरवलं. आजही, मोदी मीडियाला थेट मुलाखती फार कमी देतात, त्यांचा भर थेट लोकांशी बोलण्यावर असतो, जनतेशी बोलण्यासाठी मीडियाच्या पाया पडण्याची काही गरज नाही, हे मोदींइतकं चांगलं दुसऱ्या कुठल्याही नेत्याला कळलेलं दिसत नाही.
पंतप्रधानपदाची पहिली अडीच वर्षे
मोदींचा पंतप्रधानपदापर्यंतचा हा प्रवास नीट लक्षात घेतला तर पंतप्रधान झाल्यानंतरच्या त्यांच्या कार्यशैलीची संगती लागते. सरपंचदेखील कधी न होता, ते थेट मुख्यमंत्री झाले. पहिल्यांदाच राष्ट्रीय राजकारणात गेले ते पंतप्रधान म्हणून. दिल्लीच्या कार्यशैलीशी जुळवून घेण्यातच एखाद्याला दोन तीन वर्षे लागली असती. इथेही मोदींनी वेगळी वाट निवडली. त्यांनी तिथल्या कार्यशैलीसी जुळवलं नाही, आपली कार्यशैली लादली. पुन्हा एकदा, सर्वसामान्यांना काय वाटतं हे अचूक जाणणाऱ्या मोदींनी, सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेळा, स्वच्छ व टापटीप कार्यालये, लोकांना प्रत्येक टप्प्यावर दाद मागायची सोय अशा अनेक फुटकळ पण सामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या गोष्टींनी सुरूवात केली.
गुजरातमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी वीज, रस्ते आणि पाणी यांना प्राधान्य दिलं, त्याचप्रमाणे त्यांनी जनधन योजना, स्वच्छता, मुद्रा बँक, पायाभूत विकास, रस्ते, रेल्वे अशा करोडो लोकांच्या जीवनमरणाशी संबंध असलेल्या गोष्टींना प्राधान्य दिलं. लाल किल्ल्यावरून इंटलेक्च्युअल भा,ण करण्याच्या परंपरेला छेद देत संडास बांधण्याची साद त्यांनी घातली. सर्वसामान्यांच्या मुद्याला नाट्यमयरीत्या हात घालायचा आणि एलीट सोसायटीला शॉक द्यायचा ही त्यांची कार्यपद्धती आहे. 500 व 1000 च्या नोटाबंदी हा त्याच पठडीतला निर्णय आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी ज्याप्रमाणे, बाहेरच्या जगाशी संबंध जोडले, राज्याला केवळ राज्य न मानता अन्य देशांशी थेट जोडण्याचा प्रयत्न केला, तसाच प्रयत्न त्यांनी पंतप्रधान या नात्याने केला. ज्यांनी त्यांचा आधीचा प्रवास बघितला नाही, त्यांनी प्रवासी पंतप्रधान, अनिवासी पंतप्रधान अशी हेटाळणी केली, पण त्याचवेळी सामान्य माणूस मात्र सुखावत होता. त्याच्या पदरात काहीही पडलेलं नव्हतं, परंतु विरोधकांनी केवळ विरोधासाठी केलेल्या विरोधांमुळे ते मोदींच्या अजून जवळ जात होते. एव्हाना मोदीभक्त आणि मोदीरुग्ण यांच्यातला संघर्ष टिपेला पोचला होता. रूग्ण जितका विरोध करतील तितका कडवा प्रतिसाद भक्त देत होते. काहीही संबंध नसताना 60 वर्ष काय केलंत, पाच वर्ष तर थांबा अशी परस्पर उत्तरं भक्त रूग्णांना देत होते. भक्तांचा उन्माद इतका वाढला की, मुस्लीमांना काही ठिकाणी टार्गेट करण्यात आलं, गाईला आईपेक्षा जास्त महत्त्व आलं. हिंदुस्थान लीव्हरला चिंता वाटावी असा पतंजली ब्रँड निर्माण झाला. ज्यांनी स्वागत यात्रेचा दिवस वगळता उगवता सूर्य कधी बघितला नाही ते कपाल भाती, अनुलोम विलोमवर भाषणं द्यायला लागले. भाजपामधल्या भगवे कपडे घालणाऱ्या व एरवी ज्यांचं वर्ण केवळ एक उच्छाद असंच करता येईल अशांना तर हिंदूराष्ट्राचाच साक्षात्कार झाला. आता मोदी राम मंदीर बांधतील, मग काशी – मथुरेच्या मशिदी पाडायच्या की झालं, इतका उन्माद काहींच्या अंगात भिनला.
2002 पासून अनेकवेळा फटके बसून धडा न शिकलेले काँग्रेसचे व डावे नेते अखलाखच्या हत्येबद्दल मोदींकडे जबाब मागत होते. तेव्हाही मोदी मनात हसले असतील. आधी 10 वर्ष जसं मोदींनी त्यांना उपेक्षेनं मारलं होतं, तसंच यावेळीही मारलं होतं. मोदींनी केवळ एकदा अत्यंत कडक शब्दांमध्ये 80 टक्के गोरक्षक हे नकली असून त्यांचे काळे धंदे लपवण्यासाठी हे सुरू असल्याचं सांगितलं. त्यानंतर गोरक्षकांच्या आचरटपणाला आळाच बसला. विरोधक महिनोन महिने आकांडतांडव करत होते, मोदींनी त्यांच्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करून त्यांना योग्य वाटलं तेव्हा फक्त एकदा विषय काढला आणि संपवला.
सर्जिक स्ट्राईक्स, नोटाबंदी आणि पुढे काय…
इथपर्यंतचा प्रवास बघितला तर लगेच लक्षात येईल की, पंतप्रधान नरेंद्र मोदी 2019 किंवा कदाचित 2024 च्या लोकसभा निवडणुकांचा विचार करत आहेत. मोदींनी आत्तापर्यंत घेतलेले सगळे महत्त्वाचे निर्णय दीर्घकालीन उद्दिष्टांचे आहेत. खरा राजकारणी असतो, तो निवडणुका जिंकल्यानंतर पाच वर्षांनंतरच्या निवडणुकीची तयारी सुरू करतो.
पंतप्रधानपदाची शपथ घेताना सार्क देशांच्या प्रमुखांना बोलावणं असो, शरीफ यांना अचानक दिलेली भेट असो, पहिल्याच बैठकीत काळ्या पैशासाठी एसआयटी नेमणं असो, जीएसटी मार्गी लावण्यासाठी केलेले प्रयत्न असो, रस्ते व महामार्गांवर केलेली विक्रमी गुंतवणूक असो,  जनधन योजना असो, आधारची अमलबजावणी असो, स्वच्छ भारत अभियान असो, टॉयलेट्स बांधण्याचा कार्यक्रम असो, पाकिस्तानवर केलेली कारवाई असो की ताजं नोटाबंदी असो मोदींनी कटाक्षानं सर्वसामान्य भारतीयांना थेट संबोधित करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. ज्यांचे परिणाम दीर्घकाळासाठी होतील असे कार्यक्रम हाती घेतले आणि भाजपाची काहीही प्रतिमा असो स्वत:ची प्रतिमा मात्र विकास, विकास आणि विकास अशीच राहील याची काळजी घेतली. समान नागरी कायद्यासारख्या संवेदनशील प्रकरणीही मोदींनी करोडो मुस्लीम महिलांवर अन्याय होता कामा नये, त्यासाठी ट्रिपल तलाकची तरतूद नको अशी संयत भूमिका घेतली आहे.
नमोरूग्णांनी नी नमोभक्तांनी दोघांनीही नरेंद्र मोदी नीट समजून घेण्याची गरज आहे.
10

Sharing

About The Author: Shriram Garde

My mission is just to share the events in my life sincerely with you; as I have experienced them, not necessarily in that order. I write on various topics. Whether that means - advice, tips, tools, scriptures, or instructions on budgeting, getting out of debt, making some extra cash, investing or anything else, I intend to provide it. I was 18 years old when I started working as a labourer. I had no savings. I had no money left in my bank accounts. I know life through lot of unpleasant incidences occurring day in and day out. But what I realised is that it doesn't have to be always like that. We are not doomed to how we are currently living – we all can change! I know, because over last couple of years my family and me have paid off a huge amount of debt. I have a passion to help people come to this realisation and get started on their own journey to financial freedom. I had owned 2 Companies before moving to Finance Sector about 9 years back. Spending more than 30 years in various capacities taught me quite a lot. I have a diploma in Engineering completed in part time while I was working. I have learned a good chunk from my working background in various fields. But, like most people who are eager to learn, the bulk of what I have learned thus far is from reading magazines, books, blogs, pod cast or whatever else I can get my hands on about Personal Finance, investing, business, personal development, and time management.

Leave your comment