श्री.सुभाष चुत्तर..

श्री.सुभाष चुत्तर..

अनुकरणीय उद्योजक
“श्रीरामजी आमचा चाकणचा कारखाना बघायला या, तिथे आपण बोलू.” सुभाष चुत्तरांनी आम्हाला त्यांच्या चाकण MIDC मधल्या “असोसिएटेड मॅन्युफॅक्चरींग” या कारखान्यास भेट देण्याचे आमंत्रण दिले. आम्ही सर्व मंडळी ठरल्यादिवशी कारखान्यात धडकलो.
आम्ही गेटवर गाडी थांबवली, साधारण  कोणत्याही मोठ्या कारखान्यात आपण गेलो की गेट एन्ट्री हा उपचार करावा लागतो. वॉचमनने अंदाजाने आम्हाला ओळखले आणि गेट एन्ट्रीचे उपचार न करता सरळ कंपनीच्या व्यवस्थापकांच्या केबिनमध्ये नेले. आम्ही येणार ही बातमी सुभाष सरांनी आधीच वॉचमनपासून व्यवस्थापकांपर्यंत दिलेली होती.
चहापान झाल्यावर व्यवस्थापकांबरोबर कारखाना बघण्यास निघालो. २०-२५ हजार स्केअर फुटाची ती इमारत होती. सुभाष सरांच्या कारखान्यात मुख्यत:
Automobile Pressed Components बनवले जातात. प्रत्येक मिनिटाला धाड-धाड आवाज करणाऱ्या जवळ जवळ ३०-३५ मोठ्या प्रेस ओळीने मांडलेल्या होत्या. सगळीकडे आखीव रेखीव मांडणी. एखाद्या हॉस्पिटल सदृश पराकोटीची स्वच्छता. एखाद्या mechanical कारखान्यात अपवादाने दिसणारा नीटनेटकेपणा तिथे दिसत होता. मिनिटाला शेकडो components बनवणारी ती मशीन्स आज्ञाधारकपणे काम करत होती. जागोजागी गुणवत्ता, सुरक्षा आणि उत्पादकता यांचे महत्व सांगणारे  फलक लावलेले होते. व्यवस्थापक मोठ्या उत्साहाने सर्व दाखवत होते. प्रत्येक मशीन जवळ एक कामगार होता. जाताजाता एका कामगाराकडे लक्ष गेले. जरा वेगळा दिसणारा हा कामगार मतीमंद आहे हे लगेच जाणवले. आम्ही त्याच्या जवळ गेलो तरी आमच्या येण्याचे त्याला काही अप्रूप नव्हते तो आपल्या कामात मश्गुल होता. जसजसे पुढे जाऊ लागलो तसे अशा स्वरूपाचे अनेक कामगार दिसू लागले.
एका कामगारापाशी व्यवस्थापक थांबले आणि आम्हाला सांगितले की, हा आमच्या कारखान्यातला पहिला मतीमंद कामगार. गेली २५ वर्षे आमच्याकडे नोकरी करतो. त्याने आता स्वत:च्या हिमतीवर १ BHK flat घेतलाय. आई-वडील आणि तो एकत्र रहातात. आई-वडील म्हातारे झाले आहेत तो त्यांची म्हातारपणाची काठी बनून राहिलाय. आता तोच रिटायर व्हायला आलाय. पण रिटायर होणार नाही म्हणतोय.
कोणत्याही कारखान्यात मोठमोठी स्वयंचलित मशीनरी बघणे हे मोठे आकर्षण असते. पण इथे अशी मशिनरी होतीच, पण आता त्यांचे अप्रूप आम्हाला नव्हते, कारण आम्ही सर्व अनेक वर्षे उद्योजक आहोत.
अशी अनेक मशीन्स आम्ही बघितली आहेत. इथे आलो होतो त्याला कारण म्हणजे या कारखान्याचे वेगळेपण पहायला कारण, इथे एकंदर २२५ कामगारांपैकी जवळजवळ ६५-७०  कामगार गतीमंद होते. त्यातले काही तर मतीमंद म्हणता येतील असे होते आणि हेच सुभाष चुत्तरांच्या कारखान्याचे मोठे वैशिष्ट्य होते.
व्यवस्थापकांनी आम्हाला असेम्ब्ली सेक्शन दाखवला जिथे फोर्स मोटरच्या गाड्यांच्या दरवाजासाठी हिंजेस (बिजागरी) असेम्बल केली जात होती. इथे तर सर्वच कामगार मतीमंद होते, इतके की काही आपले नाव देखील नीट सांगू शकत नव्हते. एक दोन तर अगदी नॉर्मल माणसाप्रमाणे दिसत होते, पण मतीमंद होते. त्यात जुळणी करणाऱ्यात काही मुलीही होत्या.
“सर तुम्हाला एक आश्चर्य सांगतो की हा विभाग सर्वतोपरी मतीमंद कामगार सांभाळतात आणि  या विभागाचे रिजेक्शनचे प्रमाण  “Zero PPM” म्हणजे दहा लाखात शून्य एव्हडे आहे. यांची उत्पादकता ११०% आहे. ह्या मंडळींना एकदा काम कसे करायचे आणि चांगले काम म्हणजे काय हे शिकवले की ते काम बिनचूक झालेच म्हणून समजा. तडजोड त्यांना मान्य नाही. काम करणे त्यांच्या इतके सवयीचे होते की, दर आठवड्याला साप्ताहिक सुट्टी दिवशी घरी राहायचे असते हे त्यांना पटवणे त्यांच्या आई-वडिलांना अवघड जाते. कामावर असताना कोणतीही गोष्ट त्यांना विचलित करू शकत नाही. मुख्य म्हणजे त्यांच्यावर लक्ष ठेवावे लागत नाही. त्यामुळे या विभागात सुपरवायझरची गरज लागत नाही. अपघाताचे प्रमाण देखील शून्य आहे.” व्यवस्थापक माहिती देत होते. एक आश्चर्य आम्ही पहात होतो.
“ह्यांना पगार किती आणि कसा देता?” आपल्या मनात सहज येणारी शंका मी विचारून घेतली.
“सर ह्यांना आम्ही नॉर्मल कामगारांसारखा सरकारी नियमाप्रमाणे पगार देतो. ESI आणि PF देखील देतो शिवाय कंपनीतर्फे त्यांच्या नेण्या-आणण्यासाठी बस आहे. बसचा खर्च कंपनी करते. पालक बसस्टॉप पर्यंत सोडतात. ह्यांना पैसे कळत नाहीत. पगार बँकेत जमा करतो. पूर्वी आम्ही पगार रोख द्यायचो. तेव्हाची गंमत सांगतो. पूर्वी १००च्या नोटा द्यायचो त्यांना नोटांची किंमत कळत नसली तरी किती नोटा हे कळायचे. एकदा पगारात ५००च्या नोटा द्याव्या लागल्या. नोटा कमी भरल्या म्हणून कोणी घेईनात. शेवटी लक्षात आले की आपण नेहमी शंभरच्या नोटा देत होतो. आता पाचशेच्या दिल्या त्यामुळे नोटा कमी लागल्या म्हणून ही अस्वस्थता. आता पगार बँकेत जमा करायला सुरवात केली आहे.”
व्यवस्थापकांनी एका पंचविशीच्या मुलाची ओळख करून दिली. थोडासा बुटका, गोरा रंग, व्यवस्थित रुबाबदार पोशाख केलेला अजय, सुभाष सरांचा मुलगा असून कंपनीतला क्वालिटी कंट्रोल मॅनेजर आहे. त्याच्या चेहऱ्यावरचे देखील वेगळेपण नजरेस भरले. होय, चुत्तरांच्या अजयची अभ्यासातली गती देखील कमीच होती जेमतेम ८ वी पर्यंत शिक्षण घेऊ शकलेला अजय असाच एक दुर्दैवी जीव. पण आपली ही ओळख पुसून उमेदीने वडिलांच्याच कंपनीत काम करू लागला. या मुलांना एखादी गोष्ट कशी हवे हे शिकवले आणि त्यामध्ये काहीही वेगळेपण दिसले की ती वस्तू ते वेगळी करतात, कोणतीही तडजोड न स्वीकारता. याच गोष्टीचा उपयोग अजयला क्वालिटी कंट्रोल मॅनेजर करताना सुभाषसरांनी केला होता. आपल्या जबाबदारीची चमक त्याच्या चेहऱ्यावर आलेली दिसत होती. पण त्याच्याशी बोलताना एखाद्या क्वालिटी विभागात मुरलेल्या अधिकाऱ्याशी बोलतोय असेच जाणवत होते. ५ मिनिटे बोलून अजय कंपनीची गुणवत्ता मिटिंग कंडक्ट करण्यास निघून गेला.
जे बघत होतो ते अनाकलनीय होते. गुणवत्ता असलेले उत्पादन मतीमंद करू शकतात हेच एक आश्चर्य होते. चेहऱ्यावर कोणतेही भाव नसलेले हे दुर्दैवी चेहरे त्यांच्या जाणीवा इतक्या उत्कट होत्या आणि कहाण्या खूपच प्रेरक होत्या. प्रश्न होता तो त्या जाणिवांचा, प्रज्ञेचा शोध घेण्याचा आणि तो घेतला होता सुभाष चुत्तर यांनी. फार पूर्वी, कदाचित १७ वर्षांपूर्वी पुण्यातल्या एका entrepreneur clubच्या मिटींगला मी माझ्या मित्राबरोबर गेलो होतो. तिथे मित्राने एका गृहस्थांकडे बोट दाखवून सांगितले की, ते समोर बसले आहेत ते सुभाष चुत्तर. ते मतीमंद मुले त्यांच्या वर्कशॉपमध्ये नोकरीस ठेवतात. एव्हडी गोष्ट मनात कुठेतरी खोलवर लक्षात राहिली. मतिमंदांना नोकरी देणे ही कल्पनाच मनात इतकी घर करून बसली की, केवळ एकदा पाहिलेले सुभाष चुत्तर इतकी वर्षे मनाच्या एका कोपऱ्यात बसले होते. पण तो योग शेवटी २०१७ मध्ये आला. त्यांचा फोन शोधून काढला आणि त्यांना फोन केला. भेटण्याची वेळ घेतली आणि त्यातून वर उल्लेखलेली भेट झाली.
संपूर्ण कारखाना बघून झाला. सुभाष सरांची फोनवरून भेटण्याची वेळ घेतली. ठरल्या दिवशी ठरल्या वेळी  पाषाणरोड वरील अभिमानश्री सोसायटीत दाखल झालो. सुभाष सरांचा कारखाना बघून कर्तृत्व आणि माणुसकी उमगली होतीच, पण उत्तम सजवलेला अलिशान बंगला बघून त्यांची कलात्मक सर्जनशीलता देखील जाणवली. सुभाषसर वाट पाहतच होते. स्वागताचा सोपस्कार झाला. येण्याचा उद्देश सांगितला आणि मतिमंदांसाठीच काम निर्माण करावेसे का वाटले? हा स्वाभाविक प्रश्न आम्ही विचारला. सरांनी सुरवात केली.
“सर, त्यासाठी तुम्हाला माझी मोठी कहाणी ऐकावी लागेल,” आणि त्यांनी त्यांची कहाणी सांगावयास सुरवात केली. एक विलक्षण माणूस उलगडला. प्रत्येक वाक्यागणिक कर्तृत्वाची आणि नियतीवर विजय मिळवण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती उलगडत गेली.
“श्रीरामजी मी मुळचा नगर जिल्ह्यातील नेवाश्याचा. मारवाडी कुटुंबातला. लहानपणी अतिशय खोडकर, अभ्यासात लक्ष नसलेला उनाड मुलगा होतो. परीक्षेत कॉपी करून जेमतेम पास होत असे. कशीबशी १०वी नापास ही पायरी गाठली आणि एका गुरूने तारले.
कॉपी करताना नवाथे सरांनी पकडले आणि ते एव्हडेच म्हणाले की “तुला काय वाटते तू आम्हाला फसवतोस? नाही. बाळ, तू तुला स्वत:लाच फसवतो आहेस. हे लक्षात ठेव.” हे वाक्य कुठेतरी मनात आत लागले आणि अंतर्मनात कुठेतरी स्पार्क पडला. मी प्रतिज्ञा घेतली आयुष्यात खोटेपणा करायचा नाही. शाळा अर्धवट सोडली. तसे घरही सोडले. तडक पुण्याला येऊन राहिलो. पुण्यात बी. यु. भंडारी यांच्या गॅरेजमध्ये पडेल ते काम करू लागलो. तिथे असताना विसाव्या वर्षी एका गुजराथी मित्राच्या बहिणीच्या प्रेमात पडलो तिचे लग्नाचे वय सरले होते. तिच्या आईने सांगितले की तिला हृदय विकार आहे व ती थोड्याच दिवसांची सोबतीण आहे, तरी लग्न करशील? मी होय म्हणालो आणि लग्न केले. नंतर  मी बजाज टेम्पोत नोकरीस लागलो. तिथे अजून दोन मित्र मिळाले. काही वर्षे नोकरी करून आम्ही व्यवसाय सुरु करायचे ठरवले. अभय फिरोदियासरांनी ४० हजार रुपयांची मदत केली आणि १ लेथ घेऊन उद्योग सुरु केला. सचोटी हेच ब्रीद ठेवले. व्यवसाय वाढू लागला. लग्नानंतर ९ वर्षांनी पत्नीचे निधन झाले. तिच्या विरहाने मी अतिशय उद्विग्न झालो विष घेऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. पण मृत्यु आलाच नाही. मग ओशो भेटले. ओशोंना गुरु मानले. मी त्यांच्या समोर बसून त्यांचे प्रवचन रेकोर्ड करत असे. त्यांच्या अगदी जवळचा एक झालो. दुसरे लग्न ज्योत्स्नाशी केले. एक मुलगा झाला पण तो मतीमंद निघाला याची जाणीव तो ३ वर्षांचा असताना झाली.  ओशोंना मनाची व्यथा सांगितली. ते म्हणाले तू कर्तबगार आहेस उत्तम कारखाना चालव आणि परोपकार करत रहा. त्यातच तुला समाधान मिळेल. समोर अजय दिसत होता. ज्योत्स्नाच्या अथक प्रयत्नाने त्याचे शिक्षण जेमतेम आठवी पर्यंत झाले. पुढे शिक्षकांनी सांगितले आता हा मुलगा एव्हडेच शिकू शकेल तुम्ही दुसरा मार्ग बघा. ज्योत्स्नाने मुलासाठी खूप खस्ता काढल्या. माझा कारखाना उत्तम चालला होता दिवसेंदिवस भरभराट होत होती. पण मी मात्र कायम अजयचा विचार करत होतो. आमच्या पश्चात याचे कसे होणार? हा एकच विचार मनात सलत असायचा. मग मी त्याला कारखान्यात नेऊ लागलो. एक एक गोष्ट तो शिकू लागला. पैसा असताना माझी ही अवस्था तर अशा इतरांचे काय होत असेल? अशा मुलांना रोजगार देऊन स्वत:च्या पायावर उभे करता येईल का? हा विचार मनात आला आणि पहिल्या मतीमंद मुलाला २५ वर्षांपूर्वी नोकरीवर घेतला. त्याच्यावर ६ महिने मेहनत घेतली.
माझा स्टाफ माझ्याकडे काय वेडा माणूस? असे बघत असे. पण मालकांना कसे समजावणार? होता होता तो तयार झाला मग एकाचे २ झाले असे वाढत वाढत संख्या ६०-६५ झाली. प्रत्येक मुलावर अपार मेहनत घेतली. माझा स्टाफ देखील बदलला त्यांनी मला साथ द्यायला सुरवात केली. एक मुलगा तर आई वडिलांनी इथे सोडला. त्यावर मी २ वर्षे मेहनत घेतली. तो माझ्या केबिनमध्ये येई. मी खुर्चीवर बसलेले त्याला आवडत नसे. तो मला खुर्चीवरून उठवे आणि फिरत्या खुर्चीवर बसून फिरत बसे. मला म्हणे मी तुझा बॉस आहे. मी त्याच्या समोर बसून काम करत असे. असे २ वर्षे चालले. एक दिवस मी त्याला रागावलो आणि खाली काम करायला नेले, तर त्याने उत्तम drilling करून दाखवले. मी खुर्चीवर नसताना तो drilling बघत बसे. त्याने ते पाहून पाहून drilling आत्मसात केले होते. तो आता १५ वर्षे इथे काम करतोय. इथला प्रत्येक मुलगा किंवा मुलगी एक कहाणी आहे. रानडे आडनावाची मुलगी. तिला नाव सांगता यायचे नाही पण उत्तम शास्त्रीय गाणे गाते. तर दुसऱ्या एका मुलीचा अपघात झाला. वाहनाने धडक दिली. पाय फ्रॅक्चर झाला. तिला दवाखान्यात नेली तर डॉक्टरला हात लावू देईना. सरांना भेटायचं म्हणू लागली. मला बोलावले. मी गेलो. तिने मला विचारले सर मला नोकरीवरून काढणार नाही ना? मी तिला जवळ घेतले. समजावले. तेव्हा डॉक्टरांना माझ्या समोर प्लास्टर घालू दिले.”
हे सांगताना देखील त्यांचे डोळे पाणावले होते आणि आम्ही सुन्न होत होतो.
“माझी पत्नी ही माझी प्रेरणा आहे.” ज्योत्स्ना वहिनी तिथेच आमच्या साठी चहा आणि फराळाचे घेऊन उभ्या होत्या. त्यांचाकडे बघूनच जाणवले की त्या मूर्तिमंत करुणामूर्ती आहेत. “नवाथे गुरुजी, भगवान ओशो आणि माझी पत्नी यांच्यामुळे मी इथे पोहचलो. नाहीतर १०वी नापास मुलाला काय भविष्य असणार? मला तुम्ही सांगा ना? पण धंदा सचोटीने केला. पुण्याची एक मोठी कंपनी, मी नाव सांगत नाही. आमचा माल घ्यायला तयार होती तिथल्या ऑफिसरने महिना १०००० रुपये घरपोच आणून द्या म्हणून सांगितले. मी कस्टमर म्हणून ती कंपनी ब्लॅकलिस्ट केली. आमचे दोन कारखाने आहेत. पुण्यात २५० आणि पिथमपुरला ३०० कामगार आहेत. इथे ६८ मतीमंद काम करतात. एकदा जर्मन बॉश कंपनीचे लोक कारखाना बघावयास आले. अशी मुले बघून काम देता येणार नाही असे म्हणाले. सुरक्षितता आणि गुणवत्ता मिळणार नाही अशी त्यांना भीती वाटली. मी आमचे track रेकॉर्ड दाखवले. त्यांना पटवले ही मुले “ZERO PPM” काम करतात. त्यांनाही ते पटले. काम मिळाले. आता हा प्रयोग ते बॉश कंपनीत करणार आहेत.”
“अरेच्चा तुम्हाला घर दाखवले नाही मी तरी काय माणूस. चला घर दाखवतो.” दहा हजार स्केअर फुटाचा तो बंगला अतिशय रसिकतेने सजवला होता. सर, ह्या माझ्या बंगल्याचा मीच अर्कीटेक्ट आणि मीच इंटिरियर डेकोरेटर.” अतिशय देखणे उंची फर्निचर, किचनमध्ये गृहिणीला लागणाऱ्या स्वयंपाकातल्या प्रत्येक गोष्टीचा बारकाईने केलेला विचार, हॉल मधील सोफे शोकेस आणि बेडरूम्स सगळंच प्रेक्षणीय होते.” जोत्स्नाताईंची आवड आणि सुभाषसरांची सौदर्यदृष्टी याचा उत्तम मिलाप झालेले त्यांचे घर एक कलेचे लेणे आहे.
“सर, आता मी जवळ जवळ निवृत्त झालोय. अभय फिरोदियासर ४०० खाटांचे एक हॉस्पिटल बांधतायत. मी त्याचा आराखडा आणि बांधकाम बघणार आहे. मंगेशकर हॉस्पिटलचे डॉ. धनंजय केळकर यांनी सातव्या मजल्या वरच्या बांधकामाची आणि नव्या बिल्डींगची जबाबदारी मला दिली आहे. आता उरलो उपकारापुरता अशी मनाची भावना झाली आहे. परमेश्वराने भरभरून दिले आणि खूप करून देखील घेतले. जाता जाता मला एकच सांगावेसे वाटते. पुण्यातल्या प्रत्येक मोठ्या कंपनीने २-३ मतीमंद कामावर घेतले तरी पुण्यातल्या १५०००-२०००० मतीमंद मुलांचे प्रश्न चुटकीसरशी सुटतील. त्यांच्या पालकांना खूप सुकर होईल. पण कोणी पुढे येत नाहीत हो.” मतिमंदांविषयी असलेल्या सामाजिक अनास्थेविषयी त्यांनी खंत व्यक्त केली.
१० वी नापास असा शिक्का बसलेला हा उद्योजक माणुसकीचा चेहरा असलेला उद्योग उभारतो काय, हजारो कोटींचा व्यवहार करतो काय आणि सगळचं अनाकलनीय. अर्थात यामागे किती कष्ट आणि ज्ञान मिळवले असेल त्याचा उल्लेख या लेखात मला करताच आला नाही. पण सुभाष चुत्तारांचा हा प्रवास केवळ मोठ्या पगाराच्या नोकरीसाठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांचा पालकांना निश्चित अनुकरणीय आणि प्रेरणादायी आहे. म्हणूनच हा लेखन प्रपंच. लेख आवडला तर आपल्या प्रियजनांना पाठवा.
मनोगतात सुभाष सरांनी त्यांच्या जगण्याचे साधे सूत्र सांगितले.
“जियो तो ऐसे जिओ जैसे की, सबकुछ तुम्हारा हो| मरो तो ऐसे मरो जैसे की, तुम्हारा कुछभी न हो|
जिंदगी बेहतर होती है अगर आप खुश होते है| लेकीन जिंदगी बेहतरीन होती है अगर आप दुसरोंको खुश रखते है|”
8

Sharing

About The Author: Shriram Garde

My mission is just to share the events in my life sincerely with you; as I have experienced them, not necessarily in that order. I write on various topics. Whether that means - advice, tips, tools, scriptures, or instructions on budgeting, getting out of debt, making some extra cash, investing or anything else, I intend to provide it. I was 18 years old when I started working as a labourer. I had no savings. I had no money left in my bank accounts. I know life through lot of unpleasant incidences occurring day in and day out. But what I realised is that it doesn't have to be always like that. We are not doomed to how we are currently living – we all can change! I know, because over last couple of years my family and me have paid off a huge amount of debt. I have a passion to help people come to this realisation and get started on their own journey to financial freedom. I had owned 2 Companies before moving to Finance Sector about 9 years back. Spending more than 30 years in various capacities taught me quite a lot. I have a diploma in Engineering completed in part time while I was working. I have learned a good chunk from my working background in various fields. But, like most people who are eager to learn, the bulk of what I have learned thus far is from reading magazines, books, blogs, pod cast or whatever else I can get my hands on about Personal Finance, investing, business, personal development, and time management.

Leave your comment